मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेता सलमान खान यांच्या नावाने सोशल मीडियावर फसवे संदेश



मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश वेगाने पसरत असून, त्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. संबंधित संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कक्ष सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच गरजू रुग्णांना २५ लाखांपर्यंत आर्थिक मदत, ‘शेटे साहेब’ यांचा संपर्क क्रमांक, ‘Being Human’ संस्थेचा ईमेल, दादरमधील ‘HOPE SPECIALITY PHARMA’ आणि नाशिकमधील ‘आरोग्यदूत’ संस्थेमार्फत स्वस्त औषधे व मोफत उपचार मिळतील, असेही नमूद करण्यात आले आहे.

मात्र, या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून संबंधित संदेश पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कोणताही कक्ष किंवा योजना अस्तित्वात नाही. सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतपणे कार्यरत आहे.

अशा प्रकारचे संदेश समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. विशेषतः वैद्यकीय मदतीसारख्या संवेदनशील विषयांमध्ये अफवांवर विश्वास ठेवल्यास गरजू रुग्णांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, “राज्यात सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सलमान खान यांच्या नावाने ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ आदींबाबत फिरणारे संदेश पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे आहेत. मंत्रालयात अशा प्रकारची कोणतीही योजना किंवा कक्ष अस्तित्वात नसून, सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतरीत्या कार्यरत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी रुग्णांनी १८००१२३२२११ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. नागरिकांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहावे आणि गरजू रुग्णांना खरोखर मदत हवी असेल तर फक्त अधिकृत चॅनेल्सचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 


0/Post a Comment/Comments