श्रीगोंदा (प्रतिनिधी) - तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. आणि संबंधित मल्टीस्टेट संस्थांमधील ठेवीदारांची तब्बल २ कोटी ५३ लाख ९८ हजार ६८१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि व्यवस्थापक अशा २१ जणांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंधक कायदा तसेच बीएनएसच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव सोनबा पाचपुते, व्हाईस चेअरमन उत्तम वसंतराव मोरे, संचालक - मोहन ज्ञानदेव धगाटे, अशोक तुकाराम भोसले, चंद्रशेखर पोपटराव काळे, भगवान नारायण सोनवणे, संतोष नारायण जाधव, गोकुळ अरुण कंदलकर, राहुल बाबूराव जगताप, चंद्रशेखर शिवाजीराव मोरे, बाळासाहेब संभुदेव पाचपुते, किरण निंळकंठ कुलकर्णी, जालिंदर सोनबा पाचपुते, संतोष जगताप, नाना मारुती सुपनर, संचालिका सुनंदा अरुण डोईफोडे, सुनिता भानुदास बांदल, तारामती नाना सुपनर, सुभद्रा नारायण जाधव, सुनिता बाळासाहेब काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश अरुण डोईफोडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
काष्टी येथील मुख्य शाखा, श्रीगोंदा आणि इतर उपशाखांमधील ठेवीदारांनी बचत खाते, मुदत ठेव व फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून भविष्यासाठी बचत केली होती. संस्थेकडून १२ टक्के आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून विविध ठेव व गुंतवणूक योजना राबवण्यात येत होत्या. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदारांनी न्यायालयात धाव घेतली.
दाखल फिर्यादीनुसार, सन २०२० ते २५ मे २०२६ या कालावधीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांचा विश्वास संपादन केला आणि जमा केलेली रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचा आरोप आहे.पैसे काढण्यासाठी गेलेल्या ठेवीदारांना विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आली, तसेच रक्कम देण्यास नकार देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात तीन स्वतंत्र फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित संस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक किरण शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
लेखापरीक्षणावरही संशय व्यक्त
दोन्ही संस्थांचे संचालक आणि व्यवस्थापन जवळपास एकच असल्याने गुन्हा दाखल होताच संबंधित पदाधिकारी गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. यापूर्वीच्या लेखापरीक्षणावरही संशय व्यक्त केला जात आहे. लेखापरीक्षणात अनियमितता दडपल्याचा आरोप होत असून, सहकार विभागाला चुकीची माहिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. सध्या सुरू असलेल्या चाचणी लेखापरीक्षणातून आणखी मोठे आर्थिक घोटाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment