अहिल्यानगर - इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीचा फायदा घेत लग्नासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या २ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून त्यांच्या कडून चोरीचा २ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील बाळासाहेब गुंजाळ पाटील मळा येथे ३ मे रोजी सायंकाळी पार पडला. या वेळी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत चोरट्यांनी डाव साधत सुनिता नामदेव सरोदे व शैला वसंत जाधव यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास व्यवसायिक कौशल्याचे आधारे सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी मोटार सायकलवर ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने तात्काळ ममदापुर फाटा येथे जावुन सापळा रचुन सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रमानगर, वार्ड नं.१, श्रीरामपुर), बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. वार्ड नं.२, श्रीरामपुर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा इतर साथीदार आतिक आयुब उर्फ आरीफ शेख (रा. वार्ड नं. २, श्रीरामपुर), सनी विलास ढोकणे (रा.वार्ड नं.२, श्रीरामपुर) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपींच्या ताब्यातून १ लाख ४९ हजार ५०० रुपये किंमतीचे ११.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, ७० हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल, ७० हजार रुपये किंमतीची मोटार सायकल असा एकुण २ लाख ८९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.

Post a Comment