खळबळजनक...पुण्यातील हॉस्पिटल मध्ये आढळला डिजिटल टायमर जोडलेला बॉम्ब



पुणे - पुणे शहरातील हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटल येथे सापडलेली संशयास्पद वस्तू प्रत्यक्षात बॉम्ब असल्याचं निष्पन्न झाल्यानं या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी हा बॉम्ब कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. हॉस्पिटलचे मालक डॉ. विलास गायकवाड यांच्याशी असलेल्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा का, याचाही तपास पुणे पोलीस करत आहेत.

बुधवारी (दि. १३) संध्याकाळी हडपसरमधील उषा किरण हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील पुरुषांच्या प्रसाधनगृहात स्वच्छता करणाऱ्या महिलेला संशयास्पद वस्तू आढळली. याची माहिती मिळताच डॉ. विलास गायकवाड यांनी स्वतः ती वस्तू एका बॉक्समध्ये ठेवून हॉस्पिटलच्या बाहेरील रिकाम्या जागेत हलवली. प्रारंभी हा कोणाचा तरी खोडसाळपणा असावा असे वाटत होते.

पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तपास केल्यानंतर त्या वस्तूमध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि डिजिटल टायमर जोडलेला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ती वस्तू हडपसरमधील मोकळ्या जागेत नेण्यात आली. बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याचा नियंत्रित स्फोट झाला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट फारसा शक्तिशाली नव्हता. बॉम्ब हॉस्पिटलमध्ये फुटला असता तरी मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता कमी होती. तरीदेखील रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

हॉस्पिटलबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताना दिसली होती. मात्र तपासात ही व्यक्ती मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तपास पुन्हा नव्या दिशेने सुरू करण्यात आला आहे.

डॉ. विलास गायकवाड यांच्याशी कोणाचे शत्रुत्व होते का आणि त्यातूनच ही घटना घडवून आणली गेली का, याचा सखोल तपास पुणे पोलीस करत आहेत. सध्या या प्रकरणातील मुख्य संशयित आणि हेतू दोन्ही अद्याप अस्पष्ट आहेत.


 

0/Post a Comment/Comments