ढाका - बांगलादेशात राजकीय सत्तांतर, नव्या सरकारकडून सुरक्षेची हमी दिल्यानंतरही हिंदूंविरोधातील घटनांमध्ये घट झाल्याची चिन्हे दिसली नाहीत. मानवी हक्क संघटना एएसके, बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषद व एचआरसीबीएम यांच्या आकडेवारीनुसार, १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर अल्पसंख्याकांविरोधात आतापर्यंत ६४५ घटनांची नोंद झाली. सोशल मीडियावर हिंदू समाज व इस्कॉनला लक्ष्य करून प्रक्षोभक मजकूर प्रसारित केला जात आहे.
स्थानिक सभांत अल्पसंख्याकांचा सामाजिक बहिष्कार करण्याची व त्यांच्या संघटनांवर बंदीची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना धमक्याही देण्यात आल्या.मानवी हक्क संघटनांच्या माहितीनुसार हिंदूंच्या जमिनी बळकावण्याच्या १३२ घटना समोर आल्या. अनेक कुटुंबांनी घरातून हाकलून देण्याच्या धमक्या , घरांची तोडफोड झाल्याच्या तक्रारीही नोंदवल्या आहेत. ९५ मंदिरांची तोडफोड आणि विटंबनेच्या घटनाही समोर आल्या आहेत.
मोठ्या कटाची शक्यता... जाहीर धमक्या,कोणत्याही क्षणी परिस्थिती बिघडणे शक्य
कुमिल्ला येथील रहिवासी नंदित कुमार यांच्या मते, हिंदूंविरोधी वातावरण सर्वाधिक प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केले जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कटकारस्थानाचा संशय निर्माण करणारे संदेश व पोस्ट सातत्याने प्रसारित होत आहेत. अशा प्रकारच्या सामग्रीवर त्वरित नियंत्रण आणले नाही तर परिस्थिती कधीही बिघडू शकते. गाइबांधा येथील स्थापना हा मोठ्या राजकीय कारस्थानाचा भाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासकीय निष्क्रियता
मानवी हक्क संघटनांचा आरोप आहे की प्रशासनाकडून पुरेशी व प्रभावी कारवाई होत नसल्यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना वाढली. त्यांचा विश्वासही ढळत आहे.
भगवान श्रीरामांच्या मूर्ती प्रकल्पावर निर्णय नाही
गाइबांधा जिल्ह्यातील पलाशबारी येथील प्राचीन राधागोबिंद मंदिरात ८१ फूट उंच भगवान श्रीरामांची मूर्ती उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक कट्टरपंथी गटांनी विरोध केला. त्यानंतर इस्लामी आंदोलोन, खेलाफत मजलिस आणि जमात-ए-इस्लामीशी संबंधित नेत्यांनीही या विरोधाला पाठिंबा दिला. १९ व २० जून रोजी हिंदू संघटनांनी या निर्णयाच्या निषेधार्थ देशभर शांततापूर्ण आंदोलने केली
अल्पसंख्याकांच्या ८ सूत्री मागण्यांवर प्रगती नाही
बांगलादेश हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन ओइक्या परिषदेचे सरचिटणीस मोनिंद्र कुमार नाथ यांच्या मते, कोणत्याही समुदायासाठी केवळ प्रत्यक्ष हिंसाचारच नव्हे, तर सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्याही भीतीचे मोठे कारण ठरतात. उघडपणे धमक्या देणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो.

Post a Comment