अहिल्यानगर- शेतजमीन परत करण्यासाठी महिलेला धमकावत खोली पेटवून दिली


अहिल्यानगर - खरेदी केलेली शेतजमीन परत देण्यासाठी एका महिलेला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर संशयित आरोपीने पीडित महिलेच्या शेतातील खोलीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून ती खोली आग लावून पेटवून दिली. या आगीत खोलीतील महत्त्वाचे दस्तऐवज, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारात हि घटना घडली.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रिया गिरीश भुंजे (वय ५१, मूळ रा.पुणे, हल्ली रा. गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. पीडित महिलेने निंबळक शिवारातील गट क्रमांक ४८७/अ मधील शेतजमीन खरेदी केली होती. हीच जमीन पुन्हा परत मिळावी म्हणून संशयित आरोपी सचिन बबन बारस्कर (रा. आहिल्यानगर) हा ऑगस्ट २०२५ ते २६ मे २०२६ या कालावधीत पीडित महिलेला सतत फोन करून धमकावत होता. जमीन परत न केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी त्याने दिली होती.

यानंतर संशयिताने थेट शेतातील खोलीत घुसून जाणीवपूर्वक आग लावली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि पोलीस अंमलदार खामकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सचिन बारस्कर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.


 

0/Post a Comment/Comments