नेप्ती मार्केटमध्ये कांदे विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना चौघांकडून बेदम मारहाण

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये कांदे विक्रीसाठी गेलेल्या ३ शेतकऱ्यांना चौघांनी मोटारसायकलच्या चैनने बेदम मारहाण केल्याची घटना ८ जून रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली आहे.'आधी कांद्याचा लिलाव होऊ दे, त्यानंतर कांदे काढ', असे म्हणाल्याचा राग आल्याने हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत देविदास बाबासाहेब नागरे (वय ३५, रा. महदा, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ व नातेवाईक हे ८ जून कांदा लिलाव असल्याने त्यांच्या शेतात उत्पादित केलेले कांदे विक्री साठी नेप्ती मार्केट येथे घेवून आले होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ते आपल्या कांद्याच्या गोण्यां जवळ बसले होते.

त्यावेळी आरोपी गंगाधर रामा नागरे (रा. बारदरी, ता. नगर) हा तिथे आला आणि गोणीतून कांदे काढू लागला. फिर्यादी देविदास यांनी त्याला, "आधी कांद्याचा लिलाव होऊ दे, त्यानंतर तू कांदे काढ" असे सांगितले. या साध्या बोलण्याचा राग आल्याने गंगाधरने फिर्यादीला शिवीगाळ केली व तो तेथून निघून गेला.

काही वेळानंतर आरोपी गंगाधर नागरे हा आपल्यासोबत इतर तीन अनोळखी इसमांना घेऊन परत आला. त्या तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी देविदास यांना घट्ट पकडून ठेवले, तर आरोपी गंगाधरने त्याच्या जवळील मोटारसायकलची चैन काढून देविदास यांच्या डोक्यात मारली. या जबर हल्ल्यात देविदास गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर उपस्थित नातेवाईक सुरेश प्रल्हाद नागरे, म्हातरदेव दिनकर नागरे आणि नागनाथ सुखदेव आव्हाड यांनी जखमी देविदास यांना पिकअप गाडीतून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, मार्केट यार्डात परत गेलेले त्यांचे चुलत भाऊ म्हातरदेव नागरे यांचा फोन आला. आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, "तुमचे एकेकाचे तुकडे करून टाकीन," अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी आरोपी गंगाधर रामा नागरे व इतर तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो.हे.कॉ. रेपाळे या करत आहेत.

 


0/Post a Comment/Comments