पैशाच्या वादातून दगडाने मारहाण करत चुलत सासऱ्याचा केला खून


राहुरी - पैशाच्या वादातून चुलत जावई, पुतण्या आणि त्याचा मित्र अशा तिघांनी केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या साईनाथ भानुदास बर्डे (वय ५१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ७ जून रोजी राहुरी तालुक्यातील सडे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

सडे येथील रहिवासी असलेले साईनाथ बर्डे हे ७ जून रोजी सायंकाळी सहा वाजता गावातील महादेव मंदिर परिसरात बसले होते. त्यावेळी पैशाच्या वादातून त्यांचा चुलत जावई, पुतण्या आणि त्यांचा एक मित्र यांनी साईनाथ बर्डे यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. वडिलांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा सुनिल बर्डे धावून गेला असता आरोपींनी त्यालाही दगड मारून जखमी केले. घटनेनंतर नातेवाईकांनी गंभीर जखमी साईनाथ बर्डे यांना वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रात्री १०.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रमोद ढाकणे, भाऊसाहेब शिरसाठ, सतीश कुन्हाडे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून आरोपी लक्ष्मण भाऊसाहेब माळी, सुनिल गंगाधर पवार आणि सागर सुभाष बर्डे यांना अटक केली आहे. या प्रकरणी मयत साईनाथ बर्डे यांचा मुलगा सुनिल साईनाथ बर्डे (वय २८. रा. सडे) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे


 

0/Post a Comment/Comments