जामखेड - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहा जणांच्या टोळीने संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि बनावट लग्न लावून देत आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२५ ते ८ जून २०२६ या कालावधीत ही घटना घडली. फिर्यादी लहू महादेव ठेपे (वय २७, रा. पोतेवाडी, ता. जामखेड) यांना आरोपींनी "तुमचे लग्न लावून देतो" असे आमिष दाखवले. आरोपींनी तुळजापूर येथे एका मुलीचा फोटो दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि लग्नासाठी त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये उकळले.
यानंतर आरोपींनी फिर्यादीचे लग्न लावून दिले. मात्र, नंतर समजले की, ही मुलगी याआधीही अशाच प्रकारे इतर लोकांशी लग्न करून त्यांना फसवले आहे. ही बाब माहित असूनही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी नाना उर्फ सोमेश्वर उद्धव आढाव (रा. कवडगाव, ता. जामखेड), बापुराव बबन पवार (रा. आनंदवाडी, ता. कर्जत), नवरी पुजा बालाजी शिंदे (रा. शिवाजीनगर, लातूर,), चैतन्य गायकवाड (रा. सोलापूर), सुजाता राम नरहरे (रा. वसमत, जि. हिंगोली), रजनी गायकवाड (रा. सोलापूर) या आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८ (४), ३१६ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे हे करत आहेत.

Post a Comment