नगर जिल्ह्यात खळबळ...शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर भररस्त्यात गोळीबार


श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार केला आहे. मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने कहाणे हे बालंबाल बचावले आहेत. भररस्त्यात चालत्या गाडीवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसर आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, शहरात सध्या तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,ही घटना ८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. शिवसेना नेते प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्याचवेळी गोंधवणी परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर अचानक गोळ्या झाडल्या गेल्याने परिसरात एकच घबराट पसरली. हल्लेखोरांनी प्रशांत कहाणे यांना संपवण्याच्या उद्देशानेच हा गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने एक मोठी दुर्घटना टळली. प्रशांत कहाणे या जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी हल्लेखोरांचा कसून तपास सुरू केला आहे. हा हल्ला नेमका का करण्यात आला? या हल्ल्यामागे राजकीय वैमनस्य आहे की इतर काही वैयक्तिक कारण? याचा शोध पोलीस घेत आहेत.सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, गोळीबार करून पळून गेलेल्या अज्ञात हल्लेखोरांसह त्यांच्या दुचाकीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे श्रीरामपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरमधील पदाधिकाऱ्यांनी ८ जून रोजी दुपारीच राहुरी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक श्रीकांत दोंदे यांच्या हत्येप्रकरणी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेत जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुंडांचे थेट एन्काऊंटर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्याला काही तास उलटत नाही तोच त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांवर थेट गोळीबार झाल्याने या हल्लेखोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.   


 

0/Post a Comment/Comments