नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - सोलापूर महामार्गावर वाळूंज (ता.नगर) शिवारात शाम हॉटेलसमोर ट्रक आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. वेदांत अशोक फंड (वय १८, रा. केरूळ, ता. आष्टी, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ५ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत ऋषिकेश बाबासाहेब फंड (वय २१, रा. केरूळ, ता. आष्टी, जि. बीड) याने ९ जुलै रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व मयत हे हिरो डिलक्स मोटरसायकलने (क्र. एमएच 23 बीए ३०५६) नगर कडे येत असताना आरोपी ट्रक चालक मल्हारी अजिनाथ कुटे (रा. पिरेवाडी, ता. पाथर्डी) याने आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच १६ सीसी २७५४)भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.
या अपघातात वेदांत फंड हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी ऋषिकेश जखमी झाला. तसेच मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, स.पो.नि. गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. मंगेश खरमाळे पुढील तपास करत आहेत.

Post a Comment