मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठ्या थाटामाटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचा विवाह सोहळा पार पडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंबात सनई चौघडे वाजणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र खासदार पार्थ पवार यांचा येत्या २९ जुलै रोजी कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ आणि कायनात यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम २९ जुलै २०२६ रोजी पुण्यात होणार असल्याचे समजते. पार्थ पवार आणि कायनात धार हे गेल्या काही काळापासून अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी या दोघांनी मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात जाऊन एकत्र दर्शन आणि पूजा अर्चा केली होती. त्यांचे मंदिरातील हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर आता दोघांचा साखरपुडा होणार आहे.
पवार कुटुंबात सनई चौघडे अन् लगीन घाई
गेल्या वर्षी पवार कुटुंबात दोन विवाहसोहळे संपन्न झाले होते. यात दिवंगत अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा विवाह ०५ डिसेंबर रोजी पुण्याच्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत झाला होता. तर दिवंगत अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह मुंबईतील तनिष्का कुलकर्णी यांच्याशी झाला होता. त्यानंतर यावर्षी राष्ट्रवादीचे (श.प) अध्यक्ष खासदार शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह भाजप आमदार अरुण लखानी यांच्या मुलाशी झाला.
रेवती सुळे यांच्या लग्नात वेधले होते लक्ष
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच रेवती सुळे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,खासदार पार्थ पवार आणि त्यांच्यासोबत कायनात धार यांनी एकत्र हजेरी लावली होती. या संपूर्ण सोहळ्यात पार्थ पवार आणि कायनात यांच्या केमिस्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.
कोण आहे कायनात धार?
कायनात धार यांचे पवार कुटुंबाशी अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे बोलले जाते. त्या मूळच्या काश्मीर/हरियाणा परिसरातील असून सध्या त्यांचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे. कायनात या दिल्लीमध्येच कार्यरत आहेत. तसेच कायनात या मॉडेलिंग करीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान आता पार्थ आणि कायनात यांचा साखरपुडा होणार असून, या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment