नगर तालुक्यात भरदिवसा महिलांचे दागिने लुटीचे सत्र, दोन दिवसांत ४ घटना, महिलांमध्ये भीतीचे वातावरण


नगर तालुका (प्रतिनिधी)- शेतात काम करणाऱ्या, किंवा रस्त्याने चाललेल्या महिलांना मारहाण करत त्यांचे दागिने लुटण्याचे सत्र नगर तालुक्यातील सारोळा कासार व खडकी गावच्या परिसरात सुरु झाले आहे. विना क्रमांकाच्या दुचाकीवर हे अनोळखी चोरटे येतात, महिलांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील, कानातील दागिने ओरबाडतात आणि पुन्हा भरधाव वेगात निघून जातात. गेल्या २ -३ दिवसात अशा ४ घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात महिलावर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. 

१ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास खडकी येथील रोकडे मळा परिसरात गावचे उपसरपंच नवनाथ रोकडे यांच्या पत्नी स्वाती या शेतात जनावरांना चाऱ्यासाठी कडवळ आणायला चाललेल्या असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना मारहाण करत त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने ओरबाडून चोरटे पसार झाले. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या स्वाती यांच्या वर सारोळा कासार येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वी खडकी शिवारातच अकोळनेर-खडकी रस्त्यावर असलेल्या शेतात काम करून सायंकाळी ५.३० च्या सुमारास घराकडे परतणाऱ्या सोमनाथ नामदेव कोठुळे यांच्या आई आणि बहिण यांना तीन अनोळखी इसमांनी गाठले आणि जबरदस्तीने त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला.

या लुटमारीमध्ये चोरट्यांनी १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कुडके, ३ ग्रॅम वजनाचे टॉप्स, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि २ ग्रॅम वजनाची कर्णफुले असा एकूण ११ ग्रॅम वजनाचा आणि ४६ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लांबवला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३० जुलै रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास सारोळा कासार गावच्या रेल्वे स्टेशन परिसरात आशाबाई लिंबोरे यांना ही दुचाकीवर आलेल्या अनोळखी चोरट्यांनी रस्त्यात अडवून मारहाण करत त्यांचे दागिने लुटले होते. तर सारोळा खडकी रस्त्यावर जुना सारोळा ते पठार या दरम्यान सोनाली प्रवीण कांबळे या महिलेलाही अशाच प्रकारे मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. गेल्या २ -३ दिवसांत ४ घटना घडल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

युवकांनी राबविली चोरट्यांची शोध मोहीम

या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी तात्काळ नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच त्यांच्यासह गावातील अनेक युवक व ग्रामस्थांनी रोकडे मळा पासून थेट जाधववाडी पर्यंत चोरट्यांची शोध मोहीम राबविली. उपअधीक्षक वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी कार्ले यांनी या परिसरात फिरणाऱ्या बिगर नंबरच्या दुचाकी - चार चाकी वाहनांवर पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाई सुरु करावी अशी मागणी उपअधीक्षक वमने यांच्या कडे केली. 

0/Post a Comment/Comments