अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरीत १० जागांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे सहकार विकास पॅनल, खा.नीलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे सहकार परिवर्तन पॅनल, तर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपला सवतासुभा उभारत तीन जागांवर उमेदवार देत तिसरा स्वतंत्र पॅनल केला आहे.
१० जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात असून यात विखे-थोरात-गडाख गटाचे ८, लंके-लोखंडे गटाचे ७, तर शिंदे गटाचे ३ उमेदवार असून ९ अपक्ष उमेदवार आहेत. चिन्ह वाटपात विखे-थोरात-गडाख गटाला कपबशी, लंके-लोखंडे गटाला छत्री, राम शिंदे गटाला शिट्टी तर अपक्षांना विविध चिन्हे मिळाली आहेत. या १० जागांसाठी २ नोव्हेंबरला मतदान, तर लगेच दुसर्या दिवशी ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
भाजपाचे सर्वच पॅनलमध्ये उमेदवार
जिल्हा बँकेची निवडणूक ही सहकारातील निवडणूक असल्याने यात पक्षीय राजकारण नको असा सूर आवळत प्रस्थापित व विस्थापित नेत्यांनी आपआपल्या सोयीने भुमिका घेतल्या आहेत. विखे हे भाजपाचे नेते असून त्यांनी काँग्रेसचे थोरात व सेनेच्या ठाकरे गटाचे गडाख यांच्या सोबत आघाडी केली आहे. राष्ट्रवादी अजीत पवार गटाचेही अनेक नेते या पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या पॅनलमध्ये सर्वपक्षीय लोक सहभागी असून यात भाजपाचेही अनेक उमेदवार बिनविरोध झाले असून काही रिंगणात आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लंके व शिंदे सेना गटाचे माजी खा.लोखंडे एकत्र आले असून त्यांच्या पॅनलमध्ये भाजपाचे कैलास वाकचौरे हेही उमेदवार आहेत. तर भाजपाचे राम शिंदे यांनी सवतासुभा मांडत एक जागा बिनविरोध मिळविताना तीन ठिकाणी उमेदवार दिले आहेत.
दुसरीकडे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यातही राहुरीमधून लढत असलेले अपक्ष उमेदवार देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम हे भाजपाचेच आहेत. म्हणजे तिन्ही गटासोबतच अपक्षांमध्येही भाजपाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
दोन आमदार बिनविरोध, तिघे रिंगणात
पाथर्डी सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार मोनिका राजळे व नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून आमदार अक्षय कर्डिले हे दोन आमदार बँकेवर बिनविरोध निवडून गेले असून आता आशुतोष काळे, किरण लहामटे व प्राजक्त तनपुरे हे तीन आमदार निवडणूक रिंगणात आहेत. खासदार नीलेश लंके हे निवडणूक रिंगणात असून माजी खासदार डॉ. सुजय विखे हे बिनविरोध निवडून गेले आहेत. माजी खासदार सदाशीव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे हे निवडणूक लढवत असून वैभव पिचड हे माजी आमदार निवडणूक रिंगणात आहेत. माजीमंत्री शंकरराव गडाख हे बिनविरोध निवडून आले आहेत.
अशा होणार १० जागांवर लढती
पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघ- खा. निलेश लंके (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री) विरुद्ध राहुल शिंदे (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी)
राहुरी सेवा सोसायटी मतदारसंघ- आ. प्राजक्त तनपुरे (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरुद्ध सत्यजीत कदम (अपक्ष, चिन्ह- किटली)
अकोले सेवा सोसायटी मतदारसंघ- आ. किरण लहामटे (अपक्ष, चिन्ह- किटली) विरुद्ध संजीवनी शिंदे (अपक्ष, चिन्ह- शिट्टी)
कर्जत सेवा सोसायटी मतदारसंघ- तुषार पिसाळ (अपक्ष, चिन्ह- किटली) विरुद्ध ज्योती शिंदे (राम शिंदे गट, चिन्ह- शिट्टी)
महिला राखीव मतदारसंघ २ जागा- अनुराधा नागवडे व संगिता वाघ (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरुद्ध हर्षदा काकडे व संध्या महाडुंळे (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री), मंजुषा गुंड (राम शिंदे गट, चिन्ह- शिट्टी), पुष्पा गायकवाड (अपक्ष, चिन्ह- कपाट) , सुवर्णा पाचपुते (अपक्ष, चिन्ह- बॅट)
इतर मागास प्रवर्ग(ओबीसी)- मतदारसंघ कारभारी जावळे (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरुद्ध जालिंदर वाकचौरे (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री), अजिनाथ हजारे (राम शिंदे गट, चिन्ह- शिट्टी) शिवदास गुंजाळ (अपक्ष, चिन्ह- अॅटो रिक्षा), कडूचंद शेटे (अपक्ष, चिन्ह- प्रेशर कुकर)
अनुसूचित जाती -जमाती राखीव मतदारसंघ वैभव पिचड(सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरुद्ध प्रशांत लोखंडे (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री)
भटके विमुक्त राखीव मतदारसंघ- गणपतराव सांगळे (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरूध्द ऋषीकेश ढाकणे (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री) सुभाष गिते (अपक्ष, चिन्ह- कीटली)
शेती पूरक राखीव मतदारसंघ- आ. आशुतोष काळे (सहकार विकास पॅनल, चिन्ह- कपबशी) विरुद्ध सुधीर म्हस्के (सहकार परिवर्तन पॅनल, चिन्ह- छत्री)

Post a Comment