बसस्थानकावर मद्यधुंद पोलिसाचा तुफान राडा, चालकाला मारहाण करत 'ॲट्रॉसिटी' ची धमकी



राहाता - प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये अचानक एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची घटना अहिल्यानगर येथे घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये गोंधळ घालत वाहक आणि चालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरच्या राहता बसस्थानकात घडली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबलने "मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल", अशी धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी, सायंकाळी 5.25 वाजता उदगीर आगाराची (जि. लातूर) एमएच 24 ए.क्यु 7970 क्रमांकाची बस राहता बसस्थानकात आली. फिर्यादी वाहक बालाजी पंडितराव बोरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येवला शहर येथे नेमणूक असलेले पोलिस कॉन्स्टेबल फकिरा तोताराम थोरात यांनी दारूच्या नशेत बसमध्ये धिंगाणा घालत चालक विकास बालाजी मुंडे यांना मारहाण केली.

तसेच एवढ्यावरच न थांबता या पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांना बोलावून चालकावर हल्ला केला. यावेळी चालकाचा गणवेश देखील फाडण्यात आला. शिवीगाळ करत, "मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल", अशी धमकी देण्यात आल्याचा आरोपही वाहक बोरगावकर यांनी केला आहे. या घटनेमुळे काही काळासाठी बसस्थानकावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
राहाता पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये फकीरा थोरात, सार्थक बनसोडे (रा. साकुरी) आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा रजि. नं. 64/2026 नुसार बीएनएस कलम 132, 121(1), 351(2), 352 आणि 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक कोमल कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पोलिस या प्रकरणातील तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची पडताळणी करत आहेत.

हे ही वाचा... 

भारतातून निघालेली युद्धनौका बुडवली, ८० ठार; इराणकडून २४ तासांत बदला

'धुरंधर-२' विषयी मोठी अपडेट, सरप्राईजसाठी तयार राहा 



0/Post a Comment/Comments