टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात ७ धावांनी लोळवलं



नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात एसीसी इमर्जिंग टीम्स आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताचा वरचष्मा दिसला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकताच प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं. तसेच 20 षटकात 8 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान ठेवलं. पाकिस्तानने 20 षटकात 7 गडी गमवून 176 धावा केल्या. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. यासह स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर रसिख दार सलाम आणि निशांत सिंधूने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

भारताकडून अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंगने आक्रमक सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये या जोडीने 68 धावा ठोकल्या. अभिषेक शर्मा 22 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर प्रभसिमरनने 19 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने आक्रमक खेळी केली. दोन चौकार आणि दोन षटकार मारत 44 धावा केल्या. त्याला नेहल वढेराची साथ मिळाली त्याने 22 चेंडूत 25 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज काही खास करू शकले नाही. आयुष बदोनी फक्त 2 धावा करून बाद झाला. अंशुल कंबोजला तर खातंही खोलता आलं नाही.

0/Post a Comment/Comments