श्रीरामपूर (प्रतिनिधी) - भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडी विरोधात श्रीरामपूरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीतून भाजप पदाधिकारी निवडीचा वाद आता चव्हाट्यावर आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एक श्रीरामपूरकर नावाने फलक लावण्यात आले आहे. या बॅनरवर भाजप पदाधिकारी निवडीविरोधात घणाघाती आरोप करण्यात आले आहेत. "फॉर्च्युनर आणि पैसे असतील तर सर्व नियम शिथिल करत भाजप अध्यक्ष होता येईल. दूध भेसळीचे गुन्हे आणि काँग्रेसचा डीएनए असला तर अध्यक्ष होता येईल.अध्यक्ष होण्यासाठी भाजप सदस्य नसला तरी चालेल. मात्र पैसे आणि फॉर्च्युनर हवी. झन झन की सुनो झणकार ए पैसा बोलता है", असे डायलॉग असलेलं बॅनर श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
भाजपच्या मंडल अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या निवडी होताना भाजपचे मूळ कार्यकर्ते डावलले गेले असल्याची जोरदार चर्चा नगर जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. या निवडी करताना पक्षाने ४५ वयापेक्षा तो अधिक नसावा, सक्रिय सदस्य झालेला असावा, बूथ अनुभव असावा, पक्षाच्या विचारांना जपणारा असावा अशा नियम अटी ठेवल्या होत्या. मात्र अनेक मतदारसंघात नियमांना हरताळ फासला गेल्याची तीव्र भावना बघायला मिळते आहे.
काही तालुक्यांमध्ये काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या लोकांना थेट मंडल अध्यक्षाची पद मिळाल्याने वर्षानुवर्ष पक्ष रुजवण्यासाठी वाढवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले असल्याची चर्चा आहे. आपण तक्रार करूनही काहीच फरक पडत नाही. कारण पैशांच्या ताकदीवर धन दांडगे पक्षवेठीस धरत आहेत, अशी संतप्त भावना अनेक कार्यकर्त्यांची आहे. श्रीरामपूर तालुक्यात असाच उद्रेक एका फलकाच्या माध्यमातून बघायला मिळाला आहे. पक्षाचे वरिष्ठ खाली होणाऱ्या या कारभाराकडे लक्ष देणार का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Post a Comment