माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाने शहरासह जिल्ह्यात पसरली शोककळा


अहिल्यानगर - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग २ वेळा विजयी झालेले माजी आमदार अरुणकाका बलभीमराव जगताप (वय ६६) यांचे २ मे रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होत.काकांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता.

दिवंगत अरुणकाका जगताप यांचा जन्म २५ मार्च १९५९ रोजी झाला होता. काकांनी श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री या छोट्याशा खेड्यातून नगर शहरात येवून येथे आपले व्यावसायिक आणि राजकीय साम्राज्य निर्माण केले. सन १९८६-१९८७ मध्ये युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. नगरपालिकेत ते नगरसेवक झाले. सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले. विधानसभेला अहमदनगर शहर मतदारसंघातून सन १९८९ व १९९९ असे दोन वेळा ते अपक्ष म्हणून उभे राहिले मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले. सन २००८ मध्ये महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र स्वत: ऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. 

विधानपरिषदेवर सलग २ वेळा निवडून गेले

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सलग २ वेळा (सन २००९ व २०१६) ते निवडून गेले होते. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. आयुर्वेद  शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षांपासून काम पाहत होते. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला. अहमदनगर जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. राज्यस्तरीय मानाच्या महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डींग स्पर्धेचे यशस्वी आयोजन त्यांनी केले होते. याशिवाय नगरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावर हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन त्यांनी केले होते. घोडेस्वारी, नव्या महागड्या गाड्यांचा छंद. शेती, उद्योग, हॉटेल व्यवसायात त्यांना विशेष रुची होती. त्यांचा सर्व जाती धर्मांमध्ये मोठा मित्रपरिवार होता.

शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व वाढवले

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र ते सहा महिनेच तिथे रमले. पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येऊन त्यांनी संघर्ष केला. नगर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीनवेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडून आले तर दुसरे चिरंजीव सचिन जगताप हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे ते व्याही होत.

कोरोना संकट काळात गोरगरिबांना दिला आधार

सन २०२०-२०२१ कोरोना संकट काळात शहरातील व जिल्ह्यातील सर्वसमान्य गरजू नागरिकांना आधार देत धान्य पुरवठा करून आरोग्य सुविधा देऊन अनेक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच आ.संग्राम जगताप यांच्या साथीने गुणे आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरु करून ऑक्सिजन प्लांट उभारला. वडील स्व.बलभीमराव जगताप हे पंढरीचे वारकरी होते. त्यांचा धार्मिक कार्याचा वारसा काकांनी पुढे चालवला. शहरातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक इ. क्षेत्राला सहकार्य करत विविध कार्यक्रम घेण्याबाबत त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. तसेच अनेक मंदिरे उभारून सर्व जातींच्या संतांच्या नावाने अनेक सांस्कृतिक भवन त्यांनी उभारले.अरुणोदय गो शाळेच्या उभारणीत सहकार्य करून गोसेवेतही अरुणकाका जगताप यांचा पुढाकार होता.

काळापुढे 'दवा आणि दुवा' लागू पडल्या नाहीत

नियमित आरोग्य तपासणीसाठी ते ४ एप्रिल रोजी पुणे येथील रुग्णालयात गेले होते. मात्र तेथेच त्यांची प्रकृती बिघडली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पाच एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांना व्हेंटीलेटर  (कृत्रिम श्वासोच्छवास)ठेवण्यात आले होते. महिनाभर शहरासह जिल्ह्यात सर्वधर्मियांनी त्यांच्या आरोग्यासाठी धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना केल्या होत्या. परंतु काळापुढे 'दवा आणि दुवा' लागू पडल्या नाहीत व अखेर २ मे रोजी पहाटे त्यांचा श्वास थांबला गेला. काकांच्या निधनाने नगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली.   

बाजारपेठेत दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

 जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनानंतर कापड बाजार, मोची गल्ली मधील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी (दि.2 मे) सकाळपासूनच बाजारपेठेत गहिवरलेले वातावरण होते. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवत आपले दुःख व्यक्त केले.

अरुणकाका जगताप यांच्या निधनाची माहिती कळताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. दुकाने बंद असल्यामुळे कापड बाजार आणि मोची गल्लीत नेहमीचा गजबजाट दिसून आला नाही. बाजारपेठेत शुकशुकाट होता.

अरुणकाका जगताप यांचे बाजारपेठेतील प्रत्येक जाती-धर्माच्या व्यापारी आणि दुकानदारांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद व नगरकरांच्या मनाला चटका लावणारी आहे. अहिल्यानगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान राहिले. त्यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान झाले असून, दूरदृष्टीचा नेता गमावला असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.मार्केट यार्ड मधील व्यापाऱ्यांनीही सकाळपासूनच आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

0/Post a Comment/Comments