पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीची तरुण मुलीसह तलावात उडी घेत आत्महत्या, पारनेरकर हळहळले


पारनेर (प्रतिनिधी) - पतीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्यग्रस्त पत्नीने मुलीसह आपल्या शेताजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी पहाटे १.३० च्या सुमारास पारनेर जवळील कन्हेर ओहळ शिवारात उघडकीस आली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय ४२) व शिवांजली दत्तात्रेय औटी (वय २१) अशी माय लेकींची नावे आहेत. सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे पारनेर - सुपे रस्त्यावरील अपघातात ६ महिन्यांपूर्वी निधन झाले होते. या ह्रदयद्रावक घटनेमुळे पारनेर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पारनेर शहरात वास्तव्यास असलेल्या सुरेखा व शिवांजली नेहमीप्रमाणे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतीत काम करण्यासाठी ३१ जुलै सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेल्या होत्या.त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत काम केले.काम संपवून घराकडे परतण्याऐवजी त्यांनी शेताजवळील तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले.

सात वाजून गेल्यावरही आपली आई व बहीण घरी न परतल्याने सुरेखा यांचा मुलगा तेजसने, शेताजवळ वास्तव्यास असणाऱ्या आपल्या चुलत्यांशी संपर्क साधून आई व बहीण घरी आल्या नसल्याचे सांगितले.त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी दोघींचा शोध सुरू केला.परंतु शोध न लागल्याने रात्री ११ वाजता पारनेर पोलिस ठाण्यात दोघी हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली.  

फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस पथकाने सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता तलावाजवळ मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिस व नातेवाईकांनी तलावाच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.रात्री दीड वाजता सुरेखा यांची पिशवी व त्यातील मोबाईल तलावाच्या काठावर आढळून आले.तेथून जवळच असलेल्या तलावाच्या डोहात सुरेखा व शिवांजली यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.

तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.१ ऑगस्ट रोजी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर दोघींच्या मृतदेहावर दुपारी चार वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेखा यांचा मुलगा तेजस नुकताच १२ वीची परिक्षा पास झाला आहे. ६ महिन्यांपूर्वी तेजसच्या वडिलांचे छत्र हरपले.तर आता आई आणि बहिणही सोडून गेल्याने अठरा वर्षांच्या तेजसवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

0/Post a Comment/Comments