अहिल्यानगर - नगर तालुक्यातील डोंगरगण गावच्या शिवारात असलेल्या वांबोरी घाटात दरी मध्ये १७ फेब्रुवारीला सकाळी ११ च्या सुमारास प्लास्टिकच्या गोणी मध्ये मृतदेह आढळलेल्या तरुणाची ओळख पटविण्यात आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. किरण शिवाजी कावणे (वय ३२, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या हातावर आणि छातीवर असलेल्या टॅटू यासाठी महत्वाचा दुवा ठरला आहे.
वांबोरी घाटात दरी मध्ये १७ फेब्रुवारीला सकाळी ११ च्या सुमारास प्लास्टिकच्या गोणीमध्ये एकाचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पो.कॉ. ज्ञानेश्वर तांदळे यांच्या फिर्यादी वरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या मृतदेहाची ओळख पटवणे हे सुरुवातीला पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणि मृतदेहाचे वर्णन सर्व पोलिस ठाण्यांसह सोशल मिडीयावर प्रसारित केले.
सदर मृतदेहाच्या उजव्या हाताच्या मनगटावर 'छत्रपती' असे गोंदलेले (टॅटू) आणि छातीवर 'सोनाली' असे नाव गोंदलेले होते. ही माहिती सर्वत्र पसरल्यानंतर मयत किरण कावणे याच्या एका मित्राने ती वाचून पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ टाकळीमिया येथे जावून त्याच्या नातेवाईकांना मृतदेहाचे फोटो दाखवले. ते नातेवाईकांनी ओळखले. त्यानंतर पोलिस १८ फेब्रुवारीला सायंकाळी नातेवाईकांना घेवून नगरला जिल्हा रुग्णालयात आले. तेथे मृतदेह दाखवला तो ही नातेवाईकांनी ओळखत हा किरण कावणे असल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहिती नुसार मयत किरण हा शेती आणि पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत होता. तो ‘व्हॅलेंटाईन डे’ पासून म्हणजे १४ फेब्रुवारी पासून घरून बेपत्ता झाला होता. त्याचा १७ फेब्रुवारीला वांबोरी घाटात मृतदेह आढळून आला होता. त्याचा खुन कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला याचा पोलिसांनी कसून शोध सुरु केला असून लवकरच आरोपींना बेड्या ठोकू असे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी सांगितले.
हे ही वाचा ...
ईशान किशन टी-20 फलंदाज क्रमवारीत टॉप 10 मध्ये पोहोचला
सुपरस्टार धनुषसोबतच्या लग्नाबाबत मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली...

Post a Comment