अहिल्यानगर – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन ४२ वर्षीय शिक्षिकेस चहात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या कडून वेळोवेळी सुमारे १४ लाख ७४ हजार ८०० रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना नगर कल्याण रोडवरील पेट्रोल पंपाजवळ घडली.
याबाबत ४२ वर्षीय पीडित महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या शिक्षिका असून त्यांची राहुल नारायण मेरगू (रा.कुंभार गल्ली, लोटके पतंगवाला शेजारी, बागडपट्टी ) याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. तेव्हापासून ते फेसबुकवर तसेच प्रत्यक्षात भेटत होते. १९ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी यांची कल्याण रोडवर मेरगू याची भेट झाली. त्यावेळी मेरगू याने चहा पिण्यासाठी त्याच्या घरी बोलावले. त्यावेळी फिर्यादी यांना चहात गुंगीचे औषध टाकून फिर्यादीवर शारीरिक अत्याचार केला. याबाबत फिर्यादीने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने फिर्यादीचे फोटो दाखवून हे फोटो तुझ्या नातेवाईकांना दाखवील. फेसबुक, इंस्टाग्रामवर टाकून बदनामी करीन अशी धमकी दिली.
त्यानंतर मेरगू याने फिर्यादीकडे वारंवार पैशाची मागणी करुन तिच्याकडून फोन पे वरुन ३ लाख ७४ हजार ८०० रुपये घेतले तसेच फिर्यादीच्या भावाकडून उसने व फिर्यादीचे सोने विकून एकूण ११ लाख रुपये घेतले. त्यानंतर मेरगू याने पैशाची आणखी मागणी करीत फिर्यादी यांना धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेने दिलेले फिर्यादीवरुन राहुल मेरगू याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.
Post a Comment