अहिल्यानगर - नगर तालुक्यातील डोंगरगण गावच्या शिवारात असलेल्या वांबोरी घाटात एका अंदाजे ४० ते ४५ वर्षीय इसमाचा खुन करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणी मध्ये घालून दरीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. १७ फेब्रुवारीला सकाळी ११ च्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, नगर ग्रामीणचे पोलिस उपअधिक्षक शिरीष वनमे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी ही पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
सदरचा मृतदेह पायाकडून एक गोणी आणि डोक्याकडून एक गोणी घालून दरीत फेकण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी सदर मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला असून शवविच्छेदन अहवालानंतरच खुन कसा झाला याची माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

Post a Comment