मूल होत नाही म्हणून सासू-सासऱ्यांची अपमानास्पद वागणूक, २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन



अहिल्यानगर - मूल होत नाही म्हणून सासरकडून होणाऱ्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील नवनागापूर येथील सम्राट नगर परिसरात ही घटना उघडकीस आली. ऋतुजा तुषार राजळे (माहेरचे नाव ऋतुजा अर्जुन खुटवड, वय २५) असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी सासू- सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत ऋतुजाचे लग्न २२ एप्रिल २०२५ रोजी तुषार प्रकाश राजळे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांतच सासू-सासऱ्यांनी तिच्यावर मूल होण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. "तू गर्भवती का राहत नाहीस? तुला दर महिन्याला पाळी येते का?" अशा अत्यंत वैयक्तिक आणि अपमानास्पद प्रश्नांनी तिचा मानसिक छळ केला जात होता, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ऋतुजाने आपल्या वडिलांना फोन करून सासरचा त्रास सहन होत नसल्याचे सांगितले होते. "माझी सहनशक्ती आता संपली आहे," अशा शब्दांत तिने आपली वेदना व्यक्त केली होती. त्यावेळी कुटुंबीयांनी तिची समजूत काढून धीर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सासरचा छळ थांबला नाही.

सुसाईड नोटमुळे सासरच्यांचे पितळ उघडे

२९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ऋतुजाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी ऋतुजाने एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने सासू आणि सासऱ्यांच्या जाचाला कंटाळूनच हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. या चिठ्ठीमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी मृत तरुणीची आई नंदा अर्जुन खुटवड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे प्रकाश एकनाथ राजळे आणि सासू भारती प्रकाश राजळे (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच ऋतुजाचा संसार अशा प्रकारे संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आजही समाजात संतानासाठी विवाहितांचा होणारा छळ हा चिंतेचा विषय ठरत आहे.


 

 

0/Post a Comment/Comments