एसटी च्या शिवाई बसमध्ये महिलेशी अश्लिल कृत्य करणाऱ्या वाहकावर गुन्हा दाखल


अहिल्यानगर - एसटी महामंडळाच्या शिवाई ई बस मध्ये प्रवाशी महिलेसोबत कृत्य करणाऱ्या वाहकावर ११ मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूर मोहम्मद सिराज पटेल (वय ४२, रा. मुकुंदनगर) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या वाहकाचे नाव आहे. हा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरमधून रॅली काढत कायनेटिक चौकात ११ मे रोजी दुपारी रास्तारोको करण्यात आला होता.

यासंदर्भात तारकपूर बस डेपोचे डेपो मॅनेजर अभिजीत चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, २५ एप्रिल २०२६ रोजी तारकपूर डेपोची ई-शिवाई बस ही अहिल्यानगर-नाशिक व नाशिक-अहिल्यानगर या मार्गावर धावत होती. या बसवर वाहक म्हणून पटेल याची नियुक्ती होती. प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाला उलटीचा त्रास होत असल्याने वाहकाने चालकाकडून प्लास्टिक पिशवी घेत ती संबंधित महिलेला दिली.

त्यानंतर महिला प्रवासी मागील सीटवर जाऊन बसली. काही वेळाने वाहक पटेल देखील तिच्या शेजारी जाऊन बसल्याचे आणि महिला प्रवासीसोबत संशयास्पद तसेच अश्लील हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये नूर पटेल हा संबंधित महिलेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून आल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

या फिर्यादी वरून पोलिसांनी वाहक नूर पटेल याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २९६, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०, ११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरचा प्रकार समोर आल्यावर एसटी महामंडळ प्रशासनाकडून संबंधित वाहकाला विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे. 


 

0/Post a Comment/Comments