नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर - दौंड रोडवर खंडाळा (ता.नगर) शिवारात कार्ले वस्ती जवळ ८ जून रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास मारुती कार व पिकअप ची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात कार मधील लष्करी जवानाचा जागीच मृत्यू झाला. राजू मोहन भालसिंग (वय ४१, रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) असे मयताचे नाव आहे.
मयत भालसिंग हे नगर मधील लष्कराच्या एमआयआरसी मध्ये कार्यरत होते. तर पत्नी व मुलांसह केडगाव येथे वास्तव्यास होते. रविवारी सुट्टी असल्याने ते त्यांच्या मारुती इको कारने (क्र. एमएच १४ डीएक्स ००४७) मूळगावी सुरेगाव येथे गेले होते. तेथून रात्री उशिरा ते केडगाव ला येण्यासाठी निघाले. खंडाळा शिवारात कार्ले वस्ती जवळ नगरहून दौंड च्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील महिंद्रा पिक अप गाडीने त्यांच्या मारुती कारला समोरून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यावेळी मोठा आवाज झाला. या आवाजाने परिसरातील रोहन कार्ले व त्यांच्या खडी क्रशर वरील कामगार जागे झाले. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. रुग्णवाहिका बोलावली व पोलिसांना डायल ११२ वर फोन करून माहिती दिली.
अपघात एवढा भीषण होता की मारुती कारचा चक्काचूर झाला होता. त्यातील राजू भालसिंग यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर पिकअप मधील दोघेजण ही जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. तर मयत भालसिंग यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. मयत भालसिंग यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. या भीषण अपघातामुळे सुरेगाव व परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment