अहिल्यानगर हादरले! लोखंडी कत्तीने वार करत दाजी कडून मेव्हण्याचा निर्घृण खून


नगर तालुका (प्रतिनिधी) - पती - पत्नीचे सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्याचा लोखंडी कत्तीने छातीवर, पोटावर सपासप वार करत  निर्घृण खून केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारातील चिंतामणी डोंगर परिसरात १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. किरण रोहिदास भोसले (रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा शिवार, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत मयताचा भाऊ विक्रम रोहिदास भोसले (वय ४०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) याने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरीश गुलाब काळे (मुळ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा, हल्ली रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा ता.नगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी विक्रम याचा भाऊ किरण हा त्यांचे दाजी व बहिण यांचे भांडणे सोडविण्यासाठी गेला होता. त्याचा आरोपी मेव्हणा हरीश काळे यास राग आल्याने त्याने किरण यास शिवीगाळ दामदाटी करुन लोखंडी कत्तीने तोंडावर, छातीवर, पोटावर सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केले.

मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने त्यास तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत विक्रम भोसले याच्या फिर्यादी वरून नगर तालुका पोलिसांनी आरोपी हरीश काळे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(), ३५२, ३५१ () प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे हे करीत आहेत. 

दरम्यान खून केल्यानंतर आरोपी हरीश काळे घटनास्थळावरून तात्काळ पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे, उपनिरीक्षक उमेश पतंगे, मंगेश नागरगोजे, यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून गेला असल्याने सदर आरोपीचा पिंपळगाव कौडा, सुपा, त्याचे राहते घरी श्रीगोंदा येथे अंमलदारांमार्फत शोध घेतला परंतु आरोपी मिळून न आल्याने त्याच्या शोधासाठी नगर तालुका पोलिसांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे.  तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडूनही आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments