दिंडीत पुन्हा भीषण अपघात, नगर सोलापूर रोडवर भरधाव पिकअपने वारकऱ्यांना दिली जोरात धडक



अहिल्यानगर - पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच वारीत आणखी एक अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमध्ये भरधाव पिकअपने वारकऱ्यांना जोरात धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय.

सासवडहून पंढरीच्या मार्गाने निघालेल्या माऊलांच्या दिंडीतील वारकऱ्यांना जेजुरीजवळ एका भरधाव ट्रकने जोरात धडक दिली होती. यामध्ये ३ वारकरी महिलांचा जगीच मृत्यू झाला होता. तर ४ महिला वारकरी गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा असतानाच अहिल्यानगरमध्ये वारीत अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात मंगळवारी (दि.१४ जुलै) दुपारी हा अपघात झाला.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे नगर–सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये गवते यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या ठिकाणी गस्तीवर असलेले नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस अंमलदार सोमनाथ जायभाय, सोमनाथ वडणे, विक्रांत भालसिंग व दिंडीतील वारकरी यांनी जखमी गवतेंना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा सोमवारी रात्री साकत गावामध्ये मुक्कामी होता. आज सकाळी पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर रुईछत्तीसी शिवारात अपघाताची ही थरारक घटना घडली. या अपघातानंतर चालक गाडी सोडून प्रसार झाला आहे. नगर तालुका पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.


 

0/Post a Comment/Comments