माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल, घोसपुरी ग्रामस्थ आक्रमक


नगर तालुका (प्रतिनिधी) - अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कायद्याचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरूच आहे. हा सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो तातडीने रद्द करत या प्रकारांना वेळीच आळा घालावा अशी मागणी घोसपुरी ग्रामस्थांसह शिवसेनेच्या शिष्ट मंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नगर तालुक्यातील घोसपुरी गावात सरपंच किरण साळवे, उपसरपंच संतोष खोबरे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर झरेकर हे २ ऑगस्ट रोजी दुपारी मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी गावच्या शिवारातील सरकारी जमिनीची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना त्या परिसरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या स्वामी सर्जेराव चव्हाण या व्यक्तीने अचानक विठ्ठल हंडोरे यांच्यावर लोखंडी पाईप व दगडाने जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांना भेटण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे रुग्णालयात गेले. त्यावेळी हल्ला करणारा चव्हाण व त्याचे कुटुंबीयही जिल्हा रुग्णालयात गेले होते. तेथे संदेश कार्ले यांनी त्यांना उगाच भांडणे , मारामाऱ्या करू नका, तुमच्या घरकुलाचा प्रश्न आपण सोडवू असे समजून सांगितले. त्यानंतर चव्हाण कुटुंबातील एका महिलेने ४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात जावून संदेश कार्ले यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याची फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी संदेश कार्ले यांच्याविरुद्ध बी एन एस कलम ३५२, ३५१() () अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम  () (आर), () (एस) अन्वये  गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा हा खोटा असून कायद्याचा दुरुपयोग करत दाखल केलेला असल्याचा आरोप घोसपुरीच्या ग्रामस्थांनी केला आहे. सदरील स्वामी चव्हाण हा व्यक्ती खोटे गुन्हे दाखल करण्यात पटाईत असल्याचेही या निवेदनात म्हंटले आहे.   

संदेश कार्ले यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तातडीने रद्द करण्यात यावा तसेच ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल हंडोरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या स्वामी चव्हाण याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणने आदी कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी घोसपुरी ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी घोसपुरी ग्रामस्थांच्या समवेत शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक शाम नळकांडे, सुरेश तिवारी, दत्तात्रय कावरे, कैलास शिंदे, संजय शेंडगे, ओंकार सातपुते, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, घोसपुरीचे सरपंच किरण साळवे, उपसरपंच संतोष खोबरे, माजी उपसरपंच प्रभाकर घोडके, अशोक झरेकर, माजी सरपंच अशोक हंडोरे, पोपट झरेकर, सुभाष इधाते यांच्या सह सुमारे १०० पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंच व सदस्यांवरही खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न

संदेश कार्ले यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्यावर आता घोसपुरी गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्यांवरही ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरु असून तसा दबाव पोलिसांवर आणला जात असल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे. 

ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी हे सुशिक्षित आहेत. त्यांना ॲट्रॉसिटी कायद्याचे ज्ञान आणि गांभीर्य निश्चित आहे. त्यामुळे ते समाजात काम करत असताना जातीवाचक शिवीगाळ कसे करू शकतात. हा या कायद्याचा निश्चितच दुरुपयोग आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेने ही याचा सखोल तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.    

0/Post a Comment/Comments