अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, दोन संशयित व्यक्ती बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना पकडल्या गेल्या.या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या नावांची शेकडो बनावट निवडणूक ओळखपत्रे आढळून आली.
ही ओळखपत्रे अत्यंत शिताफीने तयार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता का, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तसेच अपक्ष उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला. त्यांनी हा प्रकार लोकशाहीस घातक असल्याचे सांगत तत्काळ सखोल चौकशीची मागणी केली. यावेळी मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून,बनावट ओळखपत्रे कोणी व कुठे तयार केली? यामागे कोणाचा हात आहे? एखाद्या संघटित टोळीचा हा प्रकार आहे का?एखाद्या उमेदवाराशी याचा थेट संबंध आहे का?या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून,पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी शिवसेनेचे उमेदवार काका शेळके, संगीता खरमाळे, नितीन शेलार यांच्या सह अपक्ष उमेदवार जयंत येलुलकर यांनी सुरु असलेल्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. त्यांनी तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी बोगस मतदान होत असल्याने सदर मतदान प्रक्रियाच बंद करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच पकडलेल्या या दोघांच्या मागील सूत्रधार कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी केली.
केडगावमध्ये महिलेचे बोगस मतदान
केडगाव मधील प्रभाग क्र. १७ मध्ये सोनेवाडी रोड वरील मतदान केंद्रावरही बोगस मतदान झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आला. मीनाक्षी शिवाजी चव्हाण ही महिला दुपारी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेली असता तेथील अधिकाऱ्यांनी तुमच्या नावावर अगोदरच मतदान झाले असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांनी हाताची सर्व बोटे त्या अधिकाऱ्यांना दाखवत माझ्या हाताच्या बोटाला शाई नाही, मी मतदानाला आत्ता आले. मग माझे नावावर मतदान कसे झाले. त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्या महिलेने तीव्र संताप व्यक्त केला.

Post a Comment