नगर तालुका हादरला... रविवारी पहाटे २ गावात सशस्र दरोडे, लाखोंचा ऐवज लंपास



नगर तालुका (प्रतिनिधी) – नगर तालुक्यात रविवारी (दि.२२) पहाटे दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चिचोंडी पाटील आणि नारायणडोह या गावांमध्ये दीड ते दोन तासांच्या अंतराने अज्ञात दरोडे खोरांनी कोयते, चाकू, लोखंडी कटावणी च्या सहाय्याने दोन घरांवर दरोडा टाकत घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने, रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला अआहे. एकाच रात्रीत पडलेल्या या दोन दरोड्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरोड्याची पहिली घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात नगर – जामखेड रोडवर सालेवडगाव फाटा येथे असलेल्या पवार वस्तीवर घडली. याठिकाणी असलेल्या सुदाम पवार (वय ७०) आणि त्यांची पत्नी पदम पवार (वय ६०) हे वृद्ध दाम्पत्य रात्री घरात झोपलेले असताना साधारण १२.३० च्या सुमारास अज्ञात दरोडेखोर तेथे आले. त्यांनी कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. घरात उचकापाचक करत असताना सुदाम पवार यांना जाग आली. तेव्हा त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पत्नी पदम पवार यांना ही मारहाण करत दरोडेखोरांनी घरातील ५ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.

दुसरी घटना तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात पहाटे २ च्या सुमारास घडली. या ठिकाणी पंढरीनाथ मारुती साठे (वय ४५) हे घराबाहेर अंगणात धान्य ठेवलेले असल्याने ते पडवीत झोपलेले होते तर कुटुंबीय घरात झोपलेले होते. पहाटे दोन वाजता त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना बाहेर आरडाओरडा ऐकू आला. त्यामुळे त्या झोपेतून उठून खिडकीतून बाहेर पाहू लागल्या. त्यावेळी अज्ञात ५ दरोडेखोर आणि पंढरीनाथ साठे यांच्यात झटापट सुरु होती. या दरोडेखोरांच्या हातात कोयते, चाकू व लोखंडी कटावणी असे साहित्य होते. त्यातील एकाने पंढरीनाथ यांच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे ते खाली कोसळले.

त्यानंतर या दरोडेखोरांनी लोखंडी कटावणीने घराचा दरवाजा उचकटला आणि आत प्रवेश करत घरातील सदस्यांना जीव प्यारा असेल तर शांत बसा. घरात काय काय आहे ते काढून द्या असे धमकावत प्रतिभा साठे यांच्या गळ्यातील तसेच घरातील लोखंडी कपाटातील सुमारे २ लाख १७ हजार रुपये किंमतीचे दागिने बळजबरीने घेवून गेले. त्यानंतर प्रतिभा साठे यांनी गावातील लोकांना बोलावून हल्ल्यात जखमी झालेले पंढरीनाथ साठे यांना उपचारासाठी नगरच्या रुग्णालयात हलविले.

घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.    

दरम्यान चिचोंडी पाटील परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच दरोड्याचा तातडीने तपास लावावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा चिचोंडी पाटील चे सरपंच शरद पवार यांनी दिला आहे.

हे ही वाचा...

ऐन रमजानमध्ये पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; १७ जणांचा मृत्यू

0/Post a Comment/Comments