काबुल - मुस्लिमांसाठी पवित्र असणाऱ्या रमजान महिन्यात
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. रविवारी सकाळी
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर मोठा हल्ला केला. पाकिस्तानने केलेल्या
एअरस्ट्राइकमध्ये अफगाणिस्तानमधील १७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. या
हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील आधीच तणावपूर्ण असलेले संबंध अधिक चिघळण्याची
शक्यता निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनाने या एअरस्ट्राइकचा
तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचा
इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला आहे.
पाकिस्तानने
अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले (Air
Strikes) केले आहे. या हल्ल्यात महिला आणि
मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. एअर स्ट्राइक दहशतवादी संघटनांच्या तळांना
उद्धवस्त करण्यासाठी केल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले. तर अफगाणिस्तानमधील 'टोलो न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार
या हल्ल्यात सामान्य नागरिकांची घरे आणि मदरशांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या
हल्ल्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव आणखी तीव्र झाल्याचे
दिसतेय. या हल्ल्याला युद्धाचे रूप मिळू शकते, असे काही तज्ज्ञांनी म्हटलेय. पाकिस्तानने रविवारी केलेल्या
या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार असल्याचे अफगाणिस्तानकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
त्यामुळे आता तालिबान काय करणार? याकडे जगाचे लक्ष लागेलय.
पाकिस्तानच्या
लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या बरमल, अरगुन आणि खोग्यानी जिल्ह्यात आणि बहसोद गनी खेल या ठिकाणी
हल्ले केले. या भागातील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि इस्लामिक
स्टेट-खोरासान (ISKP) यांसारख्या सात दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केल्याचा
दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी या
कारवाईला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान सरकार TTP ला 'फितना अल खवारिज' म्हणून संबोधते.
इस्लामाबाद, बाजौर, बन्नू आणि खैबर
पख्तूनख्वा प्रांतात गेल्या काही दिवसांत झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यांचा बदला
म्हणून पाकिस्तानने रविवारी एअरस्ट्राइक केला आहे. खैबर पख्तूनख्वा काही
दिवसांपूर्वी हल्लेखोराने विस्फोटाने भरलेली कार सुरक्षारक्षकाच्या चौकीला धडकवली
होती. यामध्ये ११ सैनिकांसह एका मुलाचा मृत्यू झाला होता. तर बन्नू जिल्ह्यात
सुरक्षा ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात एका लेफ्टिनेंट कर्नलसह दोन सैनिकांचा मृत्यू
झाला होता.

Post a Comment