एकतर्फी प्रेमात तरुणी झाली वेडीपिसी, तरुणाच्या घरी जावून घातला तुफान राडा

 


अहिल्यानगर - केडगाव परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने एका कुटुंबाच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना २८ एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. संबंधित मुलाशी लग्न लावून द्या, अन्यथा तुम्हांला किंवा स्वतःला चाकूने संपवून टाकेन, अशी धमकी देत या तरुणीने संपूर्ण कुटुंबाला घरातच सुमारे अडीच ते ३ तास अटकाव केला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित तरुणाच्या आईने फिर्याद दिली आहे. केडगावच्या रेणुकामाता कॉलनी येथील फिर्यादी महिलेचा मुलगा आणि संबंधित आरोपी तरुणी यांची ओळख महाविद्यालयात एका पथनाट्याच्या निमित्ताने सन २०२४ मध्ये झाली होती. तेव्हापासून ही तरुणी त्या मुलावर एकतर्फी प्रेम करत होती. पीडित कुटुंबाने तिला वारंवार समजावून सांगूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. यापूर्वीही १९ एप्रिल रोजी तिने घरासमोर येऊन आत्महत्येची धमकी दिली होती, ज्याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

२८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पुन्हा या तरुणीने पीडितांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. "मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचे आहे, मी इथून हलणार नाही," असे म्हणत ती दरवाजापाशी ठाण मांडून बसली. कुटुंबाने तिला बाहेर जाण्यास सांगितले असता तिने बॅगेतील चाकूचा धाक दाखवला. "तुम्ही मला बाहेर काढले तर मी तुमच्यावर वार करीन किंवा स्वतःला इजा करून घेईन," अशी धमकी देऊन तिने कुटुंबाला बराच वेळ घरातून बाहेर जाण्यास मज्जाव केला. काही वेळाने पुन्हा येण्याची धमकी देऊन ती निघून गेली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


 

0/Post a Comment/Comments