सुपा - नगर-पुणे हायवेवरील सुपा चौकात रस्ता ओलांडताना एका ६६ वर्षीय वृद्धाला अज्ञात मोटारसायकल चालकाने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश भाऊसाहेब बांगर (वय ३१ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. विठ्ठलनगर, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचे वडील भाऊसाहेब रंगनाथ बांगर (वय ६६ वर्ष) हे २० जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नगर-पुणे हायवे रोडवरील सुपा चौकातील 'वंडर वाईन' शॉपसमोरून रस्ता ओलांडत होते.
यावेळी नगरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील मोटार सायकल (क्र. एमएच १२ एक्स एस २४३०) निष्काळजीपणे चालवून भाऊसाहेब बांगर यांना जोराची धडक दिली. या अपघातामुळे भाऊसाहेब यांच्या डोक्याला पाठीमागे व डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र औषधोपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अपघात घडवल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याच्या विरुध्द सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment