अहिल्यानगर - नशामुक्त भारत' अभियानाअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बेलवंडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी संयुक्त कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे शेतात बेकायदेशीरपणे लावलेली गांजाची झाडे उघडकीस आणली आहेत. या कारवाईत ७ लाख ४३ हजार ८०० रुपये किमतीचा ३७ किलो १९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून ७५ वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदाराद्वारे बातमी मिळाली होती की, कोथुळ (ता. श्रीगोंदा) येथील दिलीप गंगाधर लाटे (वय ७५) याने स्वतःच्या राहत्या घरासमोरील शेतामध्ये कडब्याच्या पिकात लपवून प्रतिबंधित गांजाची लागवड केली आहे. या बातमीची खात्री करून एलसीबीच्या पथकाने बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन कोथुळ येथे धाड टाकली.
पंचांसमक्ष शेताची पाहणी केली असता, कडब्याच्या पिकात हिरवट रंगाचा पाला आणि फुले असलेली कॅनबिस वनस्पतीची (गांजा) झाडे आढळून आली. आरोपीकडे विचारपूस केली असता, त्याने ही झाडे स्वतःच्या नशा करण्यासाठी लावल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून ३७ किलो १९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी एलसीबीचे पोलीस अंमलदार अमोल पोपट कोतकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप गंगाधर लाटे याच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' कायदा १९८५ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पो.नि. संतोष मुटकुळे, पोउनि कृष्णकुमार सेदवाड, सपोनि नंदकुमार सोनवलकर तसेच पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, सुनील मालणकर, अमोल आजबे, यमगर, धर्मराज दहिफळे, विनोद पवार आणि राजू भोर यांनी केली आहे.
"प्रतिबंधित अंमली पदार्थांची (विशेषतः गांजा, अफू किंवा खसखस) लागवड करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. शेतकरी बांधवांनी अशा पिकांची लागवड करू नये. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची लागवड आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा." - पोलीस प्रशासन, अहिल्यानगर

Post a Comment