अहिल्यानगर - स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सत्र सुरूच ठेवले असून, कामरगाव (ता. जि. अहिल्यानगर) शिवारामधील एका तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना रंगेहात पकडले असून जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहनांसह एकूण ३ लाख ६९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला स्पष्ट निर्देश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. कृष्णकुमार सेदवाड व त्यांच्या पथकाने नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त व माहिती काढण्यास सुरुवात केली.
गस्तीदरम्यान कामरगाव शिवारातील एका ताडपत्रीच्या शेडमध्ये काही इसम तिरट नावाचा पत्त्यांचा खेळ पैशांवर खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तात्काळ पंचांसह घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी काही जण जुगार खेळताना निष्पन्न झाले.
पोलीस पथकाला पाहताच एका आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत ६ जणांना जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता पळून गेलेल्या आरोपीचे नाव तसेच हा जुगार अड्डा कोण चालवत आहे, याची माहिती सांगितली. पोलीस सध्या या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३,६९,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ६२८/२०२६) दाखल करण्यात आला असून, पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष मुटकुळे, पो.उप.नि. कृष्णकुमार सेदवाड, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, विजय पवार, सोमनाथ झांबरे, भीमराज खर्से, प्रकाश मांडगे व भगवान धुळे यांच्या पथकाने केली.

Post a Comment