अहिल्यानगर - शहर आणि परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून दिल्लीगेट आणि इम्पिरियल चौक परिसरात उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून अज्ञात चोरट्याने रोकड व दागिन्यांसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत रामेश्वर श्रीकिसन शर्मा (वय ४०, रा. शारदानगर, कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी आपली चारचाकी गाडी मनोवेध सेंटरजवळ पार्क केली होती. २४ जुलै रोजी दुपारी १२.५० ते १.४५ या वेळेत अज्ञात चोरट्याने गाडीच्या डाव्या बाजूच्या मागील खिडकीची काच फोडली. गाडीत ठेवलेली ३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि २४ हजार रुपये किमतीच्या ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन रिंग असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवला.
त्याच सुमारास जवळच उभ्या असलेल्या प्रकाश विठ्ठल वाळके यांच्या गाडीची मागील काच फोडून चोरट्याने महत्त्वाची बॅग चोरून नेली. या बॅगेत बँकेचे चेकबुक, ओळखपत्रे, वाहन परवाना तसेच बांधकामाशी संबंधित महत्त्वाची बिले व कागदपत्रे होती. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी रामेश्वर शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (ब) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
तिसर्या घटनेत बुरुडगाव रोडवर असलेल्या फेमस पुरी भाजी हॉटेल, इम्पिरियल चौक येथे पार्क केलेल्या कारची मागील काच फोडून अज्ञात चार चोरट्यांनी ६२ हजार रुपयांचा मुद्देाल चोरून नेल्याची घटना २४ जुलै रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुारास घडली. याबाबत रोहीदास इंद्रभान झावरे (वय ३२, रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २४ जुलै रोजी दुपारी आपल्या ऑरा कारने (क्र.एमएच १७ सीएस ०६७४) इम्पिरियल चौक परिसरातील फेमस पुरी भाजी हॉटेलजवळ आले होते. त्यांनी आपली कार तेथे पार्क केली होती.
दरम्यान, दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास चार अज्ञात आरोपींनी कारची मागील काच फोडली आणि कारमध्ये ठेवलेल्या फिर्यादी व त्यांच्या साक्षीदारांच्या बॅगा चोरून नेल्या. या बॅगांध्ये रोख रक्कम, डेल कंपनीचा लॅपटॉप, महत्त्वाचे कागदपत्रे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देाल होता. रोहीदास झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment