नगरमध्ये कांदा व्यापाऱ्यास कोयत्याने वार करून लुटणारा फरार आरोपी अखेर गजाआड


अहिल्यानगर - नगर शहरातील कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करून लुटणाऱ्या आणि गेल्या २ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.अंकुश उर्फ अर्जुन नामदेव पवार (वय २९, रा. प्रगती शाळेसमोर, राहुरी, ता. राहुरी) असे या आरोपीचे नाव आहे.

जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, रमीजराजा आत्तार, आजिनाथ पाखरे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड व जालींदर साखरे यांचे विशेष पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन देऊन तपासासाठी रवाना केले होते.

२७ सप्टेंबर रोजी हे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत फरार आरोपींचा शोध घेत असताना, पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी देवळाली प्रवरा ते बेलापूर जाणाऱ्या रोडवर उभा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचून अंकुश उर्फ अर्जुन नामदेव पवार यास ताब्यात घेतले.

या आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, तो कोतवाली पोलीस स्टेशन मधील भारतीय न्याय संहिता कलम ११०(२), ३११, ३२४(४) सह आर्म ॲक्ट ४/२५ तसेच राहुरी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले. दोन वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी कांदा व्यापाऱ्यास कोयत्याने वार करून केलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात हवा होता. या प्रकरणी त्यास पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

0/Post a Comment/Comments