नगर तालुक्यात महावितरणची धडक कारवाई, आकडे टाकून वीज चोरणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील आंबिलवाडी परिसरात महावितरणच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत मीटर न बसवता परस्पर आकाडा टाकून घरगुती वापरासाठी वीज चोरी केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

महावितरण शाखा कार्यालय रुईछत्तीसी येथील कनिष्ठ अभियंता विकास गेनु दिवेकर (वय ४९) यांनी याप्रकरणी फिर्यादी दिल्या आहेत. महावितरणच्या पथकाने आंबिलवाडी येथील काही रहिवाशांच्या घरी वीज जोडणीची पाहणी केली असता, त्यांच्या घरी महावितरणचे वीज मीटर बसविलेले नसल्याचे आढळून आले. असे असतानाही संबंधित ग्राहकांनी बाहेरील लघु दाब वाहिनीवरून काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या साहाय्याने थेट आकाडा टाकून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापरासाठी वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

या तिघांना वीज चोरी प्रकरणी दंडाची कारवाई करून दंड भरण्यास मुदत देण्यात आली होती, मात्र त्यांनी मुदतीत दंड न भरल्याने त्यांच्या विरुद्ध २३ सप्टेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी देण्यात आल्या. या फिर्यादी नुसार, आंबिलवाडी येथील आरोपी सोमनाथ गिताराम गोरे, नितीन दत्ता शेटे आणि संजय यशवंत गोरे यांच्या विरोधात वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मंगेश खरमाळे, आबासाहेब झावरे, शरद वांढेकर हे करत आहेत.  


 

0/Post a Comment/Comments