मार्केटयार्डच्या नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात तुफान राडा... नेमकं काय घडलं?


अहिल्यानगर - शहरातील महात्मा फुले चौक, मार्केटयार्ड परिसरात सहाय्यक सहकार अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या आरोपीने ही फिर्याद दिली असून कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर येथील सहाय्यक सहकार अधिकारी देविदास दानिअल पारधे (रा. भवानीनगर, मार्केट यार्ड जवळ, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ या कालावधीत आपल्या कार्यालयातील टपाल सेक्शन येथे उभे होते. यादरम्यान अल्ताफ गुलाब सय्यद (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) हा व्यक्ती आपले सुनावणी लेटर घेण्यासाठी तिथे आला होता.

आरोपीने पारधे यांच्याकडे पाहून जोरजोरात आरडाओरडा केला. "तू तुझ्याकडील अर्ज चौकशीचे अहवाल अधिकाऱ्यांच्या बाजूने देतो का, थांब तुझी कशी जिरवतो," असे म्हणत आरोपीने त्यांना धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच हातातील फाईल्स खाली पाडून पँटच्या खिशातून स्क्रू ड्रायव्हर काढून अंगावर उगारला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अल्ताफ सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक मेढे करत आहेत.

आरोपीकडूनही मारहाणीची तक्रार

दरम्यान गुन्हा दाखल झालेला आरोपी अल्ताफ गुलाब सय्यद यानेही कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे. या नुसार सय्यद हे २१ सप्टेंबर रोजी दुपारी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात गेले असता तेथे असलेले देविदास पारधे, सुरेश बनसोडे, वाहनचालक आकाश, अश्विनी खरपुडे आदींनी शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या विरोधात तक्रार अर्ज केल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments