अहिल्यानगर - अहिल्यानगर येथील बहुचर्चित धिरज परदेशी हत्या प्रकरणातील पाचही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. कोर्ट क्र. १ चे न्यायाधीश आर.एस. गुप्ता यांनी हा निर्णय दिला आहे.
सदर हत्येची घटना ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्तानजवळ घडली. फिर्यादी अक्षय मुळे, मयत धिरज परदेशी व काव्य गणेश तावरे हे स्ट्रीट लाईट पॅनल्सचे काम करत असताना, आरोपी मेहराज सैयद, सिराज सैयद, मुस्तकीन सैयद, युनुस शेख व इतर २-३ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांच्या हातातील लाकडी बल्ल्यांनी व लोखंडी पाईपने धिरज परदेशी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धिरज परदेशी यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान ९ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान युनुस खानसाहेब शेख, वसीम रहिम सैयद, इम्रान मुसा सैयद, अरमान लियाकत सैयद, मोहम्मद इर्शाद इम्रान सैयद या आणखी ९ आरोपींची नावे निष्पन्न केली होती. या आरोपींनी न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी होताना सरकारी पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ही घटना घडवून आणण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला होता आणि या प्रकरणाचा तपास अजून प्राथमिक स्तरावर असून आरोपींची ओळख परेड होणे बाकी आहे.
यासह विविध मुद्द्यांवर सरकारी पक्षाने युक्तिवाद मांडला. सरकारी पक्षाचा हा भरभक्कम युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचे नियमित जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. पुष्पा कापसे-गायके यांनी काम पाहिले असून त्यांना ॲड. सुहास टोणे, ॲड. सागर टाक व ॲड. अमित गाडेकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment