‘या’ गावात रात्रीच्या वेळी अचानक घरांवर दगडफेक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - मोटारसायकल वर आलेल्या तिघा इसमांनी रात्रीच्या वेळी एका घरांवर दगडफेक करत दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. दरेवाडी (ता.नगर) परिसरातील बडेकर वस्तीत रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी तिघा अज्ञात इसमांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आरती अनिल बडेकर (रा. बडेकर वस्ती, दरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोर काही अज्ञात तरुण मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी अचानक घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत घराच्या समोरील दरवाजाचे आणि वॉशिंग मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेच्या वेळी आरडाओरडा करून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली आणि शिवीगाळ करत तिथून पळ काढला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास सुरू आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

0/Post a Comment/Comments