इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न; शेकडो वाहनांचा मालक आहे जावई



संगमनेर - प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा ४ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथे पार पडला. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष इंदोरीकर महाराजांचे जावई कोण याकडे लागले होते. इंदोरीकर महाराजांच्या जावयाचे नाव साहिल चिलप असे आहे.

साहिल चिलप पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे रहिवासी आहेत. ते सध्या नवी मुंबईत व्यवसायानिमित्त राहतात. साहिल चिलप यांचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे शेकडो वाहने आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे मूळ नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. ते नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे आहेत. याच गावावरून त्यांना इंदोरीकर महाराज हे नाव मिळाले. निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी बी.एस्सी. बीएड. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी कीर्तनकार होण्याचा मार्ग निवडला आणि त्यात त्यांना मोठे यश मिळाले. 

इंदोरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतून महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांचे करोडो चाहते आहेत. यातील अनेक चाहते त्यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आले होते. जिल्ह्यातील मान्यवरांनी ही यावेळी उपस्थिती लावली होती. यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे उपस्थिती लावली होती.

0/Post a Comment/Comments