अजितदादांनंतर राष्ट्रवादीने आणखी एक शिलेदार गमावला, शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचे निधन



पुणे - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून पवार कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते अद्याप सावरलेले नाही. अशातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका शिलेदाराचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त आलेलं आहे. पुणे शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले.

शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

‘‘पुणे शहराचे दुसरे सार्वजनिक काका अशी शांतीलाल सुरतवाला यांची ओळख होती. ते गणेश मंडळाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ता होते. सर्वसामान्यांचे दुःख त्यांना माहिती होते. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात यशस्वी वाटचाल केली. ‘गणेश मंडळाचा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर अशी अनेक पदे शांतिलाल सुरतवाला यांनी भूषविली. त्यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौर पद अत्यंत प्रभावीपणे भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महापौर म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले. एक संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती

त्यांनी ‘असा महापौर पुण्याचा’ हे पुस्तकही लिहिले होते. यात त्यांनी कार्यकर्ता आणि महापौर कसा असावा हे आपल्या कार्यातून दाखवले. तत्त्वज्ञानाचे चिंतन त्यांनी प्रत्यक्ष जीवनात उतरवले. त्यांचे हे पुस्तक म्हणजे विचार मंथन करणारे असून पुढील पिढीला मार्गदर्शन करणारे आहे.



0/Post a Comment/Comments