अहिल्यानगर
- सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट)
अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात
आलेल्या दोन पोलीस अंगरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर व शस्त्र
हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
नीलेश
भालसिंग व राघवेंद्र भालसिंग अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची
नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याशी संपर्क साधला असता
त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. आमदार जगताप यांच्या सुरक्षेसाठी एकावेळी एकच
अंगरक्षक नियुक्त करण्यात आला आहे, प्रत्येकाला
१२ तासांची ड्युटी दिलेली असते, परंतु दोघेही एकाचवेळी एकाच
ठिकाणी आढळले आहेत.
या
दोन्ही पोलीस अंमलदारांवर कर्तव्याचे ठिकाण सोडून बोल्हेगाव परिसरात जाणे तसेच
जवळील सरकारी रिव्हॉल्व्हर चुकीच्या व हलगर्जी पध्दतीने हाताळल्याचा ठपका ठेवण्यात
आला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण
वातावरण असताना, अशा प्रकारे
शस्त्राची निष्काळजीपणे हाताळणी केल्याचा आरोप गंभीर मानण्यात आला आहे. दरम्यान,
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाजमाध्यमावर
चित्रफीत प्रसिद्ध करत एका पोलिसाच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर स्पष्टपणे दिसत असून,
तो अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील उमेदवाराच्या घरासमोर असल्याचा
आरोप करण्यात आला होता.
या
चित्रफितीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार
नीलेश लंके तसेच पक्षाच्या पदाधिकार्यांनी काल, मंगळवारी
सायंकाळी पोलीस अधीक्षक घार्गे यांची भेट घेतली. पोलिसांकडून चुकीच्या पध्दतीने
रिव्हॉल्व्हरचा वापर करण्यात आल्याचा आरोप करून संबंधित पोलीस अंमलदारांवर तातडीने
कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या
भेटीनंतर व चित्रफितीमधील दृश्यांच्या आधारे प्राथमिक चौकशी करून पोलीस अधीक्षक
घार्गे यांनी कारवाईचे आदेश दिले होते. आमदार जगताप यांचे अंगरक्षक म्हणून नेमणूक
असलेले आणि चित्रफितीत दिसणारे पोलीस अंमलदार नीलेश भालसिंग व राघवेंद्र भालसिंग
यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. दोघं
पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या आदेशाने जिल्हा पोलीस दलात तसेच नगर शहराच्या
राजकीय वर्तुळातही खळबळ निर्माण झालेली आहे. कोणत्याही निवडणुकीमध्ये राज्य
निवडणूक आयोग परवानाधारकांकडील शस्त्र आचारसंहितेच्या काळात जमा करून घेण्याचे
आदेश देत असते त्यानुसार नागरिकांकडे पोलिसांकडे जमा केली जातात मात्र निवडणुका
काळात पोलिसांकडूनच शस्त्र हाताळणीचा हलगर्जीपणा घडला.

Post a Comment