नगर तालुका (प्रतिनिधी) - भरधाव वेगातील महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतर ४-५ जण किरकोळ जखमी झाले. नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात सोमवारी (दि.२९ डिसेंबर) पहाटे २ च्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघातात स्कॉर्पिओ गाडी चालवत असलेले विजय मारुती वाडेकर (वय ४२, रा. रुईछत्तीशी, ता.नगर) यांचा मृत्यू झाला तर दत्तात्रय रंगनाथ मेहेत्रे हे जखमी झालेले असून त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मयत वाडेकर यांच्या सह नगरमधील १०८ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणारे ७ ते ८ जण त्यांच्या बीव्हीजी ग्रुपच्या मिटिंग साठी मुंबईला गेलेले होते. तेथील मिटिंग संपल्यावर ते रात्री नगरकडे येत होते.
पहाटे २ च्या सुमारास कामरगाव घाटात चालक वाडेकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्तादुभाजकाला धडकून उलटली. गाडीने ३ पलट्या खाल्ल्या. या दरम्यान वाडेकर हे गाडीतून बाहेर फेकले गेले व रस्तादुभाजकाला आदळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना व मेहेत्रे यांना त्यांच्या इतर किरकोळ जखमी झालेल्या सहकाऱ्यांनी उपचारासाठी नगरला रुग्णालयात हलविले. मात्र वाडेकर यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त स्कॉर्पिओ गाडी रस्त्यातून बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.
मयत वाडेकर यांच्यावर रुई छत्तीशी येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगी, २ मुले असा परिवार आहे.

Post a Comment