खा. नीलेश लंके यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता, अहिल्यानगरच्या न्यायालयाचा निर्णय



अहिल्यानगर - सन २०२३ मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर–पुणे महामार्गावर सुपा चौक येथे करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनप्रकरणी विद्यमान खासदार नीलेश लंके यांच्यासह सर्व १२ आरोपींची नगर येथील न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा. जी. जी. सोनी यांनी दिलेल्या निर्णयानुसार, आरोपींविरोधात दाखल करण्यात आलेले भारतीय दंड संहितेचे कलम ३४१ व १८८, राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ चे कलम ८(ब) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ३७ (१) (३) अन्वये कलम १३५ अंतर्गतचे आरोप संशयमुक्त पुराव्यांद्वारे सिद्ध होऊ शकलेले नाहीत.

न्यायालयाने नमूद केले की, आंदोलनादरम्यान कोणालाही इजा झाल्याचा अथवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाल्याचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. तसेच घटनास्थळी उपलब्ध असलेले स्वतंत्र व स्थानिक साक्षीदार तपासले गेले नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.

खासदार निलेश लंके च्या वतीने ॲड. परिमल फळे यांच्याकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची कायदेशीर प्रसिद्धी झाल्याचा कोणताही पुरावा प्रकरणात सादर करण्यात आलेला नव्हता. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १९५ ची पूर्तता न करता भारतीय दंड संहिता कलम १८८ अंतर्गत आरोप ठेवणे कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येत नसल्याचे न्यायालयाने मान्य केले. ॲड. फळे यांना ॲड. राहुल झावरे,  ॲड. शुभम राजुरकर, ॲड. साक्षी जाधव, ॲड. आनंद कुलकर्णी, ॲड. निखिल मुसळे, ॲड. प्रतीक ढमढेरे, ॲड. आकाश पवार यांनी सहाय्य केले.

सर्व पुराव्यांचे सखोल अवलोकन करून न्यायालयाने स्पष्ट केले की, अपूर्ण व कमकुवत पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आरोपी क्र. १ ते १२ यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असून, सर्व आरोपींची बंधपत्रे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा ...

प्‍लास्‍टिकने आवळला पृथ्‍वी भोवती फास! धक्कादायक माहिती आली समोर! 

कालीन भैया, मुन्ना, गुड्डू पंडितचा ‘भौकाल’; मिर्जापूर चित्रपटाची तारीख जाहीर  

'धुरंधर'मध्ये राहुल गांधी? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू, काय आहे प्रकरण?

0/Post a Comment/Comments