राहुरी - राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राहुरीतील माजी आ. प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीने नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी जाहीर केली. तर वंचित बहुजन आघाडीनेही ऐनवेळी उमेदवारी बदलून नगरसेवक संतोष चोळके यांचा अर्ज दाखल केला. याशिवाय अपक्ष म्हणून शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शिंदे शिवसेनेचे रवींद्र मोरे यांच्यासह इतर काहीजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी १ एप्रिलपासून उमेदवारी अर्जांची विक्री सुरु करण्यात आली होती. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत होती. त्यामुळे ६ एप्रिल रोजी राहुरीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांची मनधरणी करीत होते. त्यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.
विखे, चव्हाण, तनपुरेंची अर्धातास चर्चा
६ एप्रिल रोजी सकाळीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर तिघेही माध्यमांसमोर आले आणि चर्चेतील तपशील माध्यमांसमोर मांडला. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले, तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्याकडे काही मागण्या मांडल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, तनपुरे यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू, असे आश्वासन त्यांना दिले आहे.
प्राजक्त तनपुरे म्हणाले...
तनपुरे म्हणाले, के. के. रेंजसाठी राहुरी तालुक्यात पुन्हा आरक्षण पडणार आहे. त्यासाठीचे नोटीफिकेशन निघाले आहे. मात्र, मंत्री विखे पाटील यांनी हे आरक्षण रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. राहुरी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात रस्त्यांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. राहुरी एमआयडीसीसाठी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. वांबोरी किंवा ताहाराबाद परिसरात एमआयडीसीसाठी जागा मिळाली तर तेथे एमआयडीसीला मंजुरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुळा धरणातील मोठे पाणी समन्यायी पाणी वाटपामुळे जायकवाडीला जाते. त्यामुळे धरणातील अडीच टीएमसी गाळ काढण्याची उपाययोजना सुरु झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचाही तनपुरेंशी फोनवर संवाद
मुख्यमंत्र्यांशीही फोनवरुन चर्चा झाली आहे. डॉ. तनपुरे सहकारी कारखान्याचे प्रकरण मंत्रिमंडळ समितीसमोर आहे. त्याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. मी ज्या मुद्यांवर निवडणुकीला सामोरे जाणार होतो, ते विकासाचे सर्व मुद्दे सोडविण्याचे त्यांनी ठाम आश्वासन दिले आहे. एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री अशी मोठी माणसे माझ्याकडे आली आहेत आणि विकासाचे प्रश्न सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे, असे तनपुरे यांनी जाहीर केले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी राष्ट्रवादीकडून गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी जाहीर केली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, तनपुरे यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षाला कळविले आहे. त्यामुळे पक्षाने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ९ एप्रिल रोजी राहुरीत येत आहेत. त्यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान राहुरीतून अनिल जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी ही उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी मराठा समाजातील संतोष चोळके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, अशी माहिती वंचितचे राज्यप्रवक्ते अॅड. अरुण जाधव यांनी दिली.

Post a Comment