जामखेड (प्रतिनिधी) - जामखेड तालुक्यातील तरडगाव शिवारात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.दत्तोबा ढाळे यांच्या विहिरीमध्ये मायलेकाचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. साळू शिवाजी चौरे (वय २२) आणि तिचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश शिवाजी चौरे अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे तरडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंजारवाडी येथील बिभीषण तांदळे (वय ५९) यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पुतणी आणि नातू हे १० मे पासून बेपत्ता होते.शोध सुरू असतानाच, ११ मे सकाळी आकरा वाजेच्या सुमारास तरडगाव येथील दत्तोबा ढाळे यांच्या विहिरीत दोघांचेही मृतदेह तरंगताना आढळून आले.घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व सहाय्यक फौजदार सय्यद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीबाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान याबाबत मयत साळूचे वडील देविदास शंकर तांदळे (वय ६५, रा बांगरवस्ती, वंजारवाडी, ता. जामखेड) यांनी सायंकाळी खर्डा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरच्या छळाला कंटाळून साळू हिने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी मयत साळू चा पती शिवाजी अंगद चौरे, सासरा अंगद दशरथ चौरे, सासू विजाबाई अंगद चौरे, दिर धनंजय अंगद चौरे, जाव कमल धनंजय चौरे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पती, सासरा व दिर या तिघांना अटक केली आहे.

Post a Comment