अहिल्यानगर - लग्न ठरल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना साखरपुड्यासाठी ५ लाख आणि लग्नासाठी कपडे, मंगल कार्यालय, केटर्स तसेच इतर साहित्यासाठी ८ लाख असा खर्च करायला लावला. लग्नासाठी हुंडा म्हणून सुमारे १७ लाख रुपये किंमतीचे ११ तोळे सोने घेतले. मात्र लग्न काही दिवसांवर आल्यावर फर्निचर, भांडी आणि वरातीच्या खर्चासाठी आणखी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत ऐनवेळी लग्नास नकार देत मुलीच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार नगर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तरुणासह त्याच्या नातेवाईकांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात राहणाऱ्या कुटुंबाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरमधील एका तरुणीचा विवाह अभिजीत निवृत्ती जावळे (रा. पंढरपूर) याच्याशी ठरला होता. लग्नाच्या बोलणीदरम्यान अभिजितची आई अलका निवृत्ती जावळे, आकांक्षा समर्थ कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांनी हुंड्याची मागणी केली होती. त्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी साखरपुड्यासाठी ५ लाख रुपये खर्च केले व नवरदेवाच्या कपड्यांसाठी २५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर लग्नासाठी कपडे, मंगल कार्यालय, केटर्स तसेच इतर साहित्यासाठी ८ लाख असा खर्च करायला लावला. लग्नासाठी हुंडा म्हणून सुमारे १७ लाख रुपये किंमतीचे ११ तोळे सोन्याचे दागिने खरेदी करायला लावले. लग्नाचे धार्मिक विधी करण्याचे कारण सांगून आरोपींनी लग्नाआधीच मुलीच्या वडिलांकडून ११ तोळे सोन्याचे दागिने स्वतःकडे जमा करून घेतले.
लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना, आरोपी अभिजित व त्याच्या नातेवाईकांनी फर्निचर, भांडी आणि वरातीच्या खर्चासाठी आणखी ५ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली. पीडित कुटुंबीयांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविली असता, आरोपींनी अरेरावीची भाषा वापरत लग्न मोडल्याचा सांगावा धाडला. लग्नपत्रिका वाटून झालेल्या असताना ऐनवेळी लग्न मोडल्याने आणि ११ तोळे सोने परत न केल्याने मुलीच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर मुलीच्या आईने २३ जून रोजी आरोपी अभिजित जावळे, अलका जावळे, आकांक्षा कोकाटे आणि समर्थ कोकाटे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध फसवणूक आणि हुंडाबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment