अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार अद्याप सुरु झालेला नसतानाही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील वाद सुरु झाले आहेत. शहरातील भोसले आखाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा मुलगा व कार्यकर्त्यांनी विरोधात काम करतो म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केल्याची घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे. या वेळी झालेल्या मारामारी बाबत दोन्ही गटाच्या वतीने परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून कोतवाली पोलिस ठाण्यात २ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक चेतन शशिकांत अग्रवाल (वय ३३, रा. बुरूडगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, आपण ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते १ वाजेच्या दरम्यान भोसले आखाडा येथील कोहिनूर किराणा दुकानासमोर असताना विकास झिंजुर्डे, दत्ता झिंजुर्डे, प्रशांत झिंजुर्डे, महेश झिंजुर्डे, ऋषिकेश चौधरी, योगेश गुंड, विनोद जाधव (पूर्ण नावे माहित नाहीत) यांनी बेकायदेशीर जमाव जमवून महापालिका निवडणुकीत त्यांचे काम करत नाही म्हणून, शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विकास झिंजुर्डे याने आज याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत कोयत्याने डोक्यात वार केला. तसेच लोखंडी रॉडने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी ७ जणांच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९ (१), ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (१) (२), ३५१ (२), ३५२, १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेला विकास झिंजुर्डे हा शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग १४ मधील उमेदवार दिलीप झिंजुर्डे यांचा मुलगा आहे.
तर दुसरी फिर्याद उमेदवार दिलीप झिंजुर्डे यांच्या पत्नीने दिली आहे. यामध्ये म्हंटले आहे की, आरोपी चेतन अग्रवाल, विजु फुलसौंदर व अनोळखी ३ - ४ जणांनी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास भोसले आखाडा येथे बेकायदेशीर जमाव जमवून मुलगा विकास यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी चेतन अग्रवाल, विजु फुलसौंदर सह अनोळखी ३ - ४ जणांवर बीएनएस कलम ११५ (२), १८९ (२), १९०, १९१ (१), ३५१ (२), ३५२, १७४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment